कवी,वात्रटिकाकार " विशाल मस्के " यांची महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर गाजलेली कविता;
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,...
माझ्या समस्त मावळ्यांनो,महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सांगतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||धृ||
आज तिनशे वर्ष होऊन गेले
हा महाराष्ट्र तुमच्याकडे सोपवला आहे
पण या महाराष्ट्रात आज
रासवांचा बाजार फोफावला आहे
म्हणूनच तर तुम्हाला आज,हा सांगावा धाडतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||१||
काय,चाललंय काय या महाराष्ट्रात
सर्वत्र अनागोंदी कारभार चाललाय
जणू गतानुगतिक आले संपुष्टात
अन् अराजकतेचाच दरबार भरलाय
प्रत्येकजण आप-आपल्या परीनं,या महाराष्ट्राला ओरबाडतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||२||
अन्याय अन् अत्याचार करणाराला
तेव्हा आम्ही पायदळी तुडवला
ते तुमचेच तर पुर्वज होते
ज्यांच्या सामर्थ्यांनं मी महाराष्ट्र घडवला
कुठे गेली ती क्रांतीची आग,का मराठी बाणा घुटमळतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||३||
आम्ही कित्तेक लढाया केल्या आहेत
पण कधीच शेतकर्याच्या पिकाला धक्का नव्हता
मंदिर,मज्जिद अन् कुराण बायबल
ना यांना कधी धक्का होता
म्हणूनच तर तो इतिहास, आजही जगभरात गौरवतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||४||
स्वराज्यात कधीच स्रीयांना भय नव्हतं
शत्रुंच्या स्रीयाही आम्ही जपलेल्या आहेत
कित्तेक गौरव केलेल्या स्रीयांना
इतिहासानंही टिपलेल्या आहेत
आज मात्र स्रीयांवरील अत्याचार पाहून,तलवारीतला जोर सळसळतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||५||
जाती-धर्माच्या भींती आम्ही तेव्हाच पाडल्या होत्या
अठरा पगड जाती स्वराज्यासाठी झटल्या होत्या
स्वराज्याची निर्मिती हेच ध्येय मनी ठेऊन
क्रांतीसाठी जणू पेटून ऊठल्या होत्या
आज मात्र आम्हालाच जाती-धर्मात अडकवण्याचा प्रयत्न होतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||६||
वागायचं असेल तर माणूसकीनं वागा
जगायचं असेल तर स्वाभिमानानं जगा
नाहीतर स्वत:चे शिरच्छेद करून घ्या
पण माझ्या महाराष्ट्राला काळीमा फासु नका
मानवतेच्या कल्याणासाठी हा,कठोरतेचा हूकूम सोडतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||७||
कित्तेक मावळ्यांनी रक्त सांडवुन
हा महाराष्ट्र जपलेला आहे
एका-एका मावळ्याचं शौर्यर पाहून
हा आसमंतही दिपलेला आहे
म्हणूनच तर या महाराष्ट्रासाठी,आजही जीव तळमळतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||८||
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.9730573783
सदरील कविता विशाल मस्के यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी आणि चालु घडामोडींवर आधारित दैनंदिन वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
सदरील कविता आवडल्यास नावासहीत शेअर करू शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा