हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ७ एप्रिल, २०१५

थरथरणारे हात लिहिती,...

थरथरणारे हात लिहिती,...

थरथरणारे हात लिहिती,उपेक्षितांचे दु:ख
ओले
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||धृ||
माणसांच्या सुखालाही,माणसांचे कर्म
नडले
माणसांच्या जाती मध्ये,जाती आणि धर्म
वाढले
माणसाची जात मात्र,माणूसच विसरला आहे
माणसांचा शत्रु आज,माणूसच ठरला आहे
माणसांशी वागतानाही,जणू माणसं झालेत
खुळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||१||
वेग-वेगळ्या जातीचा,वेग-वेगळा झेंडा आहे
वेग-वेगळ्या धर्माचा,वेग-वेगळा अजेंडा
आहे
प्रत्येक जाती-धर्मानं,आपला झेंडा ठरवलाय
मानवतेचा अजेंडा मात्र, माणसांतुनच
हरवलाय
नासमज म्हणण्या इतकेही,दिसत नाहित भोळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||२||
गतानुगतिकांचे स्रोत,आता जणू संपलेत
व्यवस्थेतील माणसं,बिनबोभाट झोपलेत
दिव्याचा प्रकाश जणू,दिव्याखालीच पडलाय
अन् सामाजिक तिमीरात,दिवा सुध्दा दडलाय
पण माणसांनीच विणले आहे,हे विषादाचे
जाळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||३||
अमानवी कृत्य सुध्दा, मानवाकडून होऊ
लागलेत
अन् माणूसकी पासुन माणसं,दूर-दूर जाऊ
लागलेत
नात्यांच्या पावित्र्याचेही,आता नुसतेच
भास आहेत
माणसांच्या विश्वासावर,अविश्वासी
विश्वास आहेत
मना-मनात फोफावले आहेत,कपटीपणाचे मळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||४||
स्रीयांची सुरक्षितता इथे, अजुन असुरक्षित
आहे
स्री-पुरूषांतील भेद मात्र,इथे आरक्षित
आहे
अन्याय आणि अत्याचार, अजुनही टळले नाही
स्री-पुरूष समतेचे ब्रीद,त्यांना अजुन कळले
नाही
खोलवर समाजात रूतली आहेत, विषमतेची मुळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||५||
अनागोंदी या जगण्यामागे,विचारच संकूचित
आहेत
म्हणूनच तर आज वंचित,अजुनही वंचित आहेत
वेदनांचे काहूर इथले,अजुनही ना निर्गमले
आहे
ना उपेक्षितांचे दु:ख,जगण्यातुनही विरले
आहे
ना लागले आहेत अजुनही, अमानुषतेला टाळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||६||
क्षणो-क्षणाला अन पदो-पदावर
जणू उद्रेक होतोय रासवांचा
इथे माणसांचेही बाजार भरले
पण ना बाजार पाहिला आसवांचा
विकासाच्या आशेवरच,मंद झाली कित्तेक
पाऊले
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||७||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

( कविता आवडली तर जरूर शेअर करा परंतु कवितेखालुन नाव काढू नये,...)
( कवितेचा ऑडीओ मिळविण्यासाठी Whatsapp नंबर :- 9730573783 )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा